नवीन शैक्षणिक आराखड्यानुसार शिक्षण पद्धतीत यावर्षीपासून काय बदल होणार??

येत्या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक आराखड्यात मोठे बदल होणार..

● नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक रचना ५+३+३+४ अशी करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वप्राथमिक शिक्षणाची तीन वर्षे आणि इयत्ता पहिली व दुसरी अशी एकूण पाच वर्षे ‘पायाभूत’ म्हणून गणण्यात आली आहेत.


● त्यातील पूर्व प्राथमिक टप्प्यासाठी ‘आकार’ हा बालशिक्षण अभ्यासक्रम राबविला जात आहे.


● पहिलीच्या पाठ्यपुस्तकांचेही काम युद्धपातळीवर असून पहिली आणि दुसरीला मराठी, इंग्रजी, गणित, कलाशिक्षण, कार्यशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण या सहा विषयांसोबत आता हिंदीचाही समावेश इयत्ता पहिलीपासून करण्यात येणार आहे.

● इयत्ता तिसरी ते पाचवी ला पूर्वतयारी स्तर तर इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांना पूर्व माध्यमिक स्तर म्हणून गणले आहे.


● इयत्ता नववी ते बारावी माध्यमिक स्तर असणार आहे.


● या संपूर्ण रचनेत इयत्ता तिसरीपासून दहावीपर्यंत हिंदी बंधनकारक करण्यात आले आहे.


● इयत्ता बारावीपर्यंत मराठी विषय देखील बंधनकारक आहे.


● तिसरी ते पाचवी मराठी किंवा माध्यम भाषा, इंग्रजी, हिंदी या तीन भाषा व गणित, विज्ञान, समाजशास्त्र, कार्यशिक्षण, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण असे नऊ विषय असतील. याशिवाय कब, बुलबुल हा उपक्रम बंधनकारक असेल.


● इयत्ता सहावी ते आठवीसाठी देखील वरील नऊ विषय आणि स्काऊट गाइड हा उपक्रम असेल. मात्र, हिंदी भाषेऐवजी संस्कृत किंवा परदेशी आणि देशी भाषांमधील कोणत्याही दोन भाषा संयुक्तपणे निवडता येतील. तसेच कार्यशिक्षणा या विषयाऐवजी व्यावसायिक शिक्षण हा विषय असेल.


● इयत्ता नववी आणि दहावी या इयत्तांत विद्यार्थ्यांना एकूण १५ विषय आहेत. मराठी, इंग्रजी या दोन भाषा बंधनकारक आहेत, तिसरी भाषा म्हणून हिंदी, संस्कृत किंवा इतर देशी किंवा परदेशी भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय आहेत. याशिवाय नव्याने व्यवसाय शिक्षण, आंतरविद्याशाखा, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण असे विषय असणार आहेत. स्काऊट गाइड हा उपक्रम देखील बंधनकारक असेल. रस्ते सुरक्षा, नागरी संरक्षण, समाजसेवा यातील एक विषय या वर्गाच्या विद्यार्थ्यांना निवडावा लागेल.


● 10 वी नंतर कोणत्याही शाखेतील विषयांची निवड विद्यार्थी करू शकतील. त्यात मराठी, इंग्रजी या किमान दोन भाषा निवडणे बंधनकारक आहे. त्याशिवाय तिसरी भाषा म्हणून देशी, परदेशी भाषा किंवा प्रगत इंग्रजी यापैकी एक समावेश असेल. पर्यावरण आणि शारीरिक शिक्षण हे विषयही बंधनकारक असणार आहेत. शिवाय इतर विषयांची तीन गटांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटात कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण यांतील विषय आहेत तर दुसऱ्या गटात सामाजिक शास्त्रे, वाणिज्य, पर्यावरण या शाखांतील विषय आहेत. तिसऱ्या गटात गणित, संगणक, विज्ञान या शाखांतील विषयांचा समावेश असणार आहे. त्यातील किमान दोन गटांतून चार विषय विद्यार्थ्यांना निवडावे लागतील.

सौजन्य : दै. लोकसत्ता

Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group