
इ.९वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती या दोन केंद्र पुरस्कृत योजना सन २०२२-२३ पर्यंत ऑफलाईन पध्दतीने राबविली जात होत्या. या योजनांच्या निकषांनुसार सदर योजनेचा ४० टक्के हिस्सा राज्य शासनामार्फत व ६० टक्के हिस्सा केंद्र शासनामार्फत अदा करणेत येत आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून वितरित करण्यात आलेल्या राज्य हिस्स्याची (४० टक्के) माहिती विहीत नमुन्यात केंद्र शासनास सादर करावी लागते व तद्नंतरच केंद्र हिस्सा (६० टक्के) संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्नीकृत बँक खात्यामध्ये केंद्र शासनाच्या NSP पोर्टलद्वारे जमा करण्यात येतो.
त्याकरिता सन २०२२ – २३ मधील शिष्यवृत्ती अदा केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती केंद्र शासनास सादर करावयाच्या दृष्टीने माहे सप्टेंबर व ऑक्टोबर २०२३ मध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडून excel sheet मध्ये विद्यार्थीनिहाय माहिती प्राप्त करुन घेण्यात आली होती. सदर माहिती केंद्र शासनास केंद्र हिस्सा अदा करावयाच्या दृष्टीने आयुक्तालयामार्फत सादर करण्यात आली होती. तथापि सदर माहितीमध्ये केंद्र शासनाकडून विद्यार्थीनिहाय अतिरिक्त माहितीची मागणी करणेत आलेली आहे. तेंव्हा उपरोक्त अतिरिक्त माहिती केंद्र शासनास सादर केल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्यांना केंद्र हिस्स्याची शिष्यवृत्तीची रक्कम केंद्र शासनाकडून अदा केली जाणार आहे.
याबाबत संदर्भिय पत्रान्वये सदरहू दोन योजनांची विद्यार्थीनिहाय अतिरिक्त माहिती आयुक्तालयास दि.०८.१०.२०२४ अखेर आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेल्या गुगलशीट मध्ये अद्ययावत करणेबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांना सूचित करण्यात आले
आहे. सदर गुगलशीट मध्ये अद्ययावत केलेल्या माहितीचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन (व्ही.सी.) बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस आपण व्यक्तीश: उपस्थित रहावे, ही विनंती.